Menu

दुनिया
चीनला हाँगकाँगचा दाखला का देत नाही?

nobanner

आपण काश्मीरवर लक्ष ठेवून आहोत, असे चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग म्हणत असतील, तर भारत हाँगकाँगमधील लोकशाहीवादी चळवळीच्या मुस्कटदाबीकडे लक्ष ठेवून असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी का म्हणत नाहीत, असा प्रश्न जिनपिंग भारत दौऱ्यावर येत असताना काँग्रेसने विचारला आहे.

भारताच्या अंतर्गत प्रश्नांना लक्ष्य करण्यापासून चीनला रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल पक्षाने मोदी सरकारवर टीका केली.

आम्ही काश्मीरवर बारीक लक्ष ठेवून आहोत, असे क्षी जिनपिंग म्हणतात. मग,  आम्ही हाँगकाँगमधील लोकशाहीवादी निदर्शनांची मुस्कटदाबी पाहतो आहोत,  आम्ही झिनजियांगमध्ये मानवाधिकारांचे उल्लंघन होताना पाहतो आहोत,  तिबेटमध्ये कायम दडपशाही होताना आम्ही पाहतो आहोत,  आम्ही दक्षिण चीन समुद्रातील हालचालींकडे लक्ष ठेवून आहोत, असे पंतप्रधान कार्यालय किंवा परराष्ट्र व्यवहार मंत्रालय का म्हणत नाहीत, असे प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी ट्विटरवर विचारले.

चीन पाकव्याप्त काश्मीरचा आणि तो परत घेण्याचा मुद्दा मांडतो, तेव्हा पाकिस्तानने चीनला ‘अवैधरीत्या दिलेल्या’ अक्साई चीनबाबत भारताने चीनला जाब विचारावा, असे आव्हानही तिवारी यांनी दिले.

चीन काश्मीर मुद्दा मांडत असताना भारत झिनजियांगमधील मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा मुद्दा का उपस्थित करत नाही, असेही त्यांनी विचारले.

मोदी-जिनपिंग भेटीसाठी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था

मामल्लपुरम (तमिळनाडू) : भारत आणि चीन यांच्या शीर्षस्थ नेत्यांच्या भेटीपूर्वी तमिळनाडूतील मामल्लपुरम (महाबलीपुरम) शहरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्यामुळे त्याला अक्षरश: तटबंदी असलेल्या किल्ल्याचे स्वरूप आले आहे. याशिवाय शहराच्या सौंदर्यीकरणासह इतर तयारीही वेगात सुरू आहे.

महाबलीपुरमच्या किनाऱ्यावर असलेल्या मंदिरांजवळ तटरक्षक दलाचे एक जहाज तैनात करण्यात आले असून सुरक्षाविषयक उपाययोजनांचा भाग म्हणून तमिळनाडूच्या निरनिराळ्या भागांतून बोलावलेले ५ हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी शहरात व शहराभोवती तैनात करण्यात आले आहेत, असे पोलिसांनी बुधवारी सांगितले.

किनाऱ्यावरील मंदिराच्या मागे तटरक्षक दलाचे एक जहाज काही अंतरावर उभे असतानाच, आणखी एक जहाज गस्त घालत असल्याचे पीटीआयच्या प्रतिनिधीने पाहिले. याबाबत विचारले असता, यात काहीही वावगे नसल्याचे सांगून अधिक माहिती देणे संरक्षण विभागाच्या एका अधिकाऱ्याने टाळले.

भारत व चीन यांच्यातील संबंध बळकट करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग हे ११ व १२ ऑक्टोबरला येथे चर्चा करणार असून, यात दुसऱ्या अनौपचारिक परिषदेत दहशतवादाच्या विरोधाचाही विषय चर्चेला असेल.