Menu

दुनिया
चीनचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर येणार; सीमा प्रश्नावर चर्चेची शक्यता

nobanner

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांच्या सीमा प्रश्नावरही चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत आणि चीन या दोन्ही देशांनी हा प्रश्न संवादाच्या मार्गानं सोडवावा, असं मत चीनचे राजदूत सून वेईडोंग यांनी व्यक्त केलं. जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दरम्यान, जिनपिंग हे 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार असल्याची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली. या दौऱ्यादरम्यान दिपक्षीय संबंध वाढवण्यासोबतच व्यापाऱ्याच्या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात येणार आहे. चेन्नईजवळील मामल्लापुरम येथे 11 आणि 12 ऑक्टोबर रोजी ही बैठक पार पडणार आहे. तसंच यानंतर जिनपिंग हे 13 ऑक्टोबर रोजी नेपाळ दौऱ्यावर रवाना होणार असल्याचंही चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.

यापूर्वीही भारत आणि चीनमध्ये कोणत्याही अजेंड्याशिवाय बैठक पार पडली होती. 27 आणि 28 एप्रिल 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचा दौरा केला होता. त्यावेळीही कोणताही अजेंडा ठरवून तो दौरा आयोजित करण्यात आला नव्हता. त्यावेळी डोकलामवरून भारत आणि चीनमध्ये तणावाचं वातावरण होतं.