Menu

देश
कुत्र्याला घराबाहेर काढलं, मुलीने आईविरोधात नोंदवली पोलीस तक्रार

nobanner

आईने भटक्या कुत्र्याला घराबाहेर काढले म्हणून मुलीने आईविरोधात पोलीस स्थानकात तक्रार नोंदवल्याची घटना घाटकोपर पंतनगरमध्ये घडली आहे. मुलगी काही महिन्यांपूर्वी या कुत्र्याला घरी घेऊन आली होती. आईविरोधात प्राण्यांना क्रूर वागणूक दिल्याच्या आरोपाखाली तक्रार नोंदवण्यात आली आहे. घराबाहेर काढल्यापासून हा कुत्रा बेपत्ता आहे. आई विरोधात तक्रार नोंदवणाऱ्या तरुणीचे नाव स्नेहा निकम आहे. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे.

यावर्षी जानेवारी महिन्याच्या स्नेहाच्या मैत्रिणीला रस्त्यात कुत्र्याचे पिल्लू सापडले. ती नेहाच्या घरी घेऊन आली. आपण त्या कुत्र्याच्या पिल्लाचे ‘कुकी’ असे नामकरण केले व त्याची देखभाल करत होतो असे नेहाने सांगितले. सहा सप्टेंबरला सकाळी ५.३० च्या सुमारास नेहाला तिच्या आईने अश्विनीने उठवले व कुकी सोसायटी बाहेर गेल्याचे सांगितले. स्नेहा लगेच झोपेतून उठली व तिने कुकीचा शोध सुरु केला.

पण अनेक तास प्रयत्न करुनही कुकीचा शोध लागू शकला नाही. स्नेहाने इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये तिच्या आईने सकाळी सव्वाचारच्या सुमारास कुकीला इमारतीबाहेर नेल्याचे दिसले. स्नेहाने जेव्हा याबद्दल आपल्या आईला विचारले तेव्हा कुकीला मी बाहेर घेऊन गेले पण तो कुठे गेला हे माहित नाही असे उत्तर दिले.

माझी आई जाणीवपूर्वक कुत्र्याला बाहेर घेऊन गेली व त्याला रस्त्यात सोडले. ती माझ्याबरोबरही खोटे बोलली पण सीसीटीव्ही फुटेजमधून सत्य समोर आले. कुकीला कुठे सोडलं याबद्दल मी तिला वारंवार विचारलं पण तो कुठे गेला ते आपल्याला माहित नाही ऐवढेच उत्तर ती देते असे स्नेहाने सांगितले. कुत्र्याची माहिती देणाऱ्याला इनाम देण्याचीही स्नेहाची तयारी आहे. स्नेहाने आता आपल्याच आईविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे. अश्विनी यांचे स्टेटमेंट नोंदवण्यासाठी पोलिसांनी त्यांना बोलावले आहे. आम्ही आवश्यक कारवाई करु असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.