Menu

देश
औद्योगिक ग्राहकांसाठी ऊर्जा विभागाची धडपड

nobanner

उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील लोकसभा मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती होत असल्याने छोटय़ा समाजघटकांनाही महत्त्व आले असून वीजदरातील वाढीसह वीजपुरवठा व देखभाल दुरुस्तीबाबतच्या नानाविध समस्यांमुळे नाराज असलेल्या या पट्टय़ातील राज्यातील औद्योगिक वीजग्राहकांच्या नाराजीचा फटका बसू नये यासाठी ऊर्जा विभागाने धडपड सुरू केली आहे. पुढील तीन टप्प्यांत मतदान होणार असलेल्या पट्टय़ातील औद्योगिक ग्राहकांशी ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’द्वारे संवाद साधत त्यांना समस्या सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

सप्टेंबर २०१८ मध्ये राज्यात वीजदरवाढ झाल्यानंतर औद्योगिक वीजग्राहक नाराज झाले होते. राज्यात जवळपास तीन लाख ९० हजार औद्योगिक ग्राहक असून त्यांच्यावर लाखो कामगारांचे भवितव्य अवलंबून आहे. गेल्या सहा महिन्यांत विविध जिल्ह्य़ांत औद्योगिक ग्राहकांना आंदोलन केले व बैठका घेतल्या. मराठवाडा आणि विदर्भातील वीजग्राहकांना भाजप सरकारने विशेष योजनेअंतर्गत वीजदरात सवलत दिली आहे. त्यामुळे त्या भागातील औद्योगिक ग्राहकांची दराबाबत फारशी नाराजी नाही. पण राज्यात सर्वाधिक औद्योगिक ग्राहक असलेल्या उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, ठाणे, नवी मुंबई आदी भागांत वीजदरांवरून नाराजी आहे.

गुरुवार १८ एप्रिल, २३ एप्रिल व २९ एप्रिल या दिवसांत राज्यात या भागातील मतदारसंघात मतदान होणार आहे.

या पाश्र्वभूमीवर ठाणे, वाशी, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, अहमदनगर, सांगली, जळगाव, रत्नागिरी, मालेगाव, मिरज-कुपवाड, डोंबिवली, शहापूर, मुरबाड, वसई या भागातील औद्योगिक वीजग्राहकांशी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संवाद साधला. त्यामुळे युती व आघाडीत चुरशीच्या लढती असलेल्या भागात औद्योगिक वीजग्राहकांच्या नाराजीचा फटका बसू नये यासाठी भाजपच्या अखत्यारित असलेल्या ऊर्जा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महावितरणने प्रशासकीय कामकाजाच्या स्वरूपात या मंडळींशी संवाद साधून मलमपट्टी केल्याची चर्चा आहे.

महावितरणने आमच्याशी प्रथमच संवाद साधला आहे. वीजदरातील वाढ, देखभाल दुरुस्तीनिमित्त वीजपुरवठा खंडित होण्याचा विषय अशा विविध विषयांवर चर्चा झाली. वीजदरातील वाढीबाबत राज्य सरकार व वीज नियामक आयोगाकडे पाठपुरावा करण्याचा सल्ला महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिला. तर देखभाल दुरुस्तीची कामांची पद्धत सुरळीत करण्याचे, अर्जप्रक्रिया ऑनलाइन करून दप्तरदिरंगाई कमी करण्याचे व दर आठवडय़ाऐवजी महिन्यातून एकदाच औद्योगिक क्षेत्राचा वीजपुरवठा बंद करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. खुल्या बाजारातून स्वस्त वीज विकत घेण्याची परवानगी द्या व त्यावरील अधिभार दूर करा, अशी मागणी आम्ही केल्यावर तसे केल्यास महावितरण बंद पडेल, असे उत्तर व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी दिल्याचे कोल्हापुरातील उद्योजक प्रदीप वारंबळे यांनी सांगितले.

‘महिन्यातून एकदाच वीजपुरवठा खंडित करणार’

महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार हे नवीन उपक्रम हाती घेत असतात. त्याअंतर्गतच उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील व कोकणातील जिल्ह्य़ांतील औद्योगिक ग्राहकांच्या तक्रारी, समस्या मार्गी लावण्यासाठी त्यांच्याशी प्रथमच ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’द्वारे   संवाद साधण्यात आला. औद्योगिक क्षेत्रात आठवडय़ाला एक दिवस वीजपुरवठा खंडित करून देखभाल दुरुस्तीची कामे करण्याऐवजी महिन्यातून एकदाच वीजपुरवठा खंडित केला जाईल, असे आश्वासन त्यांनी उद्योजकांना दिले आहे, असे महावितरणचे जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी सांगितले.