Menu

देश
अर्थव्यवस्थेची मरगळ झटकण्यासाठी घेतला होता नोटाबंदीचा निर्णय-जेटली

nobanner

नोटाबंदीचा निर्णय देशाच्या अर्थव्यस्थेला आलेली मरगळ झटकण्यासाठी घेण्यात आला होता. काळा पैसा बाहेर यावा हा या कठोर निर्णयाचा मुख्य हेतू होता. ज्यांनी देशाबाहेर काळा पैसा जमा केला होता तो सरकारी तिजोरीत जमा करण्यास सांगितले होते. ज्यांनी तो केला नाही अशांवर आम्ही कारवाईही केली आहे असे म्हणत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी हा निर्णय योग्यच असल्याचे म्हटले आहे. नोटाबंदीच्या निर्णयाला दोन वर्षे झाली आहेत. त्यावरून पुन्हा एकदा काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या निर्णयावर टीका केली. ज्यावर उत्तर देत जेटलींनी हा निर्णय देशहितासाठीच घेतला होता असे म्ह  टले आहे.

अरूण जेटलींपाठोपाठ रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनीही हा निर्णय देशहिताचाच होता त्यावर टीका करण्याची आवश्यकता नाही असे म्हटले आहे. नोटाबंदीचा निर्णय आर्थिक पारदर्शकता आणण्यासाठीच घेतला होता. या निर्णयामुळे भ्रष्टाचाराशी दोन हात करणे सरकारला शक्य झाले. तसेच काळ्या पैशावरही अंकुश लावता आला. भारताला भ्रष्टाचाराच्या जोखडातून सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेतला होता. हा निर्णय कठोर होता हे मान्य आहे मात्र तो देशहितासाठीच घेण्यात आला होता असेही गोयल यांनी म्हटले आहे.

दरम्यान काँग्रेसने मात्र या निर्णयावर कडाडून टीका केली आहे. नोटाबंदीच्या निर्णयाचा फटका समाजातल्या प्रत्येक वर्गाला बसला आहे. असं म्हणतात की काळ सगळ्या जखमांचं औषध असतो पण दुर्दैवाने नोटाबंदीच्या निर्णयाच्या बाबतीत असं झालं नाही असंही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. काळ्या पैशावर अंकुश, बनावट नोटांची छपाई बंद करणे आणि दहशतवाद्यांना मिळणारे टेरर फंडिंग रोखण्याच्या उद्देशाने नोटाबंदीचा निर्णय घेतला गेला. मात्र यापैकी कोणता उद्देश सफल झाला? असा प्रश्न विचारत काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनीही या निर्णयावर टीकाच केली आहे.