Menu

देश
अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवली ऊर्जेचा कमीत कमी वापर करणारी गाडी

nobanner

वाढती लोकसंख्या आणि शाश्वत जीवनशैलीची आवश्यकता या दोन आव्हानांचा मुकाबला करण्याच्या दृष्टीने पर्यावरणस्नेही ऊर्जास्त्रोतांची मागणी सातत्याने वाढत आहे. कार्बन उत्सर्जनात घट करणे आणि पर्यावरणाच्या जतन करण्यासह विकासाला वेग देण्यासाठी नवनवे इंधन पर्याय शोधले जात आहेत. त्या अनुषंगाने मुंबईतील के. जे. सोमय्या महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक वाहनाची निर्मिती केली आहे.

या गाडीचे नामकरण ईटीए (ईटा) असे करण्यात आले असून १९ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत शेल टेक्नॉलॉजी सेंटर बंगळुरू (एसटीसीबी) येथे होणाऱ्या कार्यक्रमात १४ जणांची टीम या गाडीच्या प्रतिकृतीचे सादरीकरण करणार आहे. गॅसोलिन श्रेणीत ते सहभागी होणार आहेत. या नव्या वाहनात सिंगल सिलिंडर ८० सीसी क्षमतेचे गॅसोलिन इंजिन असून सेंट्रिफ्युजल क्लच, चेन आणि स्प्रॉकेट यंत्रणेच्या माध्यमातून सिंगल रिअर व्हिलला गती मिळते. आगामी ‘शेल मेक द फ्युचर लाइव्ह इंडिया २०१९’ मध्ये या तंत्राचा वापर करून या गाडीच्या माध्यमातून २०० किलोमीटर पेक्षा जास्त प्रति लीटरची सरासरी गाठण्याचे या टीमचे उद्दीष्ट आहे.

आभाळातून ज्या प्रकारे पावसाचे थेंब जमिनीवर पडतात, त्यापासून प्रेरणा घेऊन वाहनाचे आरेखन करण्यात आले आहे. गाडीची मागील बाजू ही पुढील बाजूच्या तुलनेत काहीशी अरुंद आहे, त्यामुळे फ्लो सेपरेशनमुळे घट होऊन हवेचा रेटा कमी होतो. हे वाहन संपूर्णतः कार्बन फायबरपासून बनवले असल्यामुळे वजनाने हलके आहे. या वाहनावर जर पुरेसे काम झाले तर निर्मिती पातळीवर देखील त्याची अंमलबजावणी शक्य होईल आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादनही सुरु करता येईल असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.